२ कोटी ८८ लाखांच्या निधीतून गणेशवाडीत कामे सुरु, मान्यवरांची विशेष उपस्थिती
गंगापूर, (प्रतिनिधी) : : लोककल्याणकारी राज्यकारभाराची आदर्श परंपरा निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून तालुक्यातील ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. तालुक्यातील एकूण ११ ऐतिहासिक बारवांच्या संवर्धन व जीर्णोद्धाराच्या कामांचा शुभारंभसोमवारी गणेशवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी शासनाने २ कोटी ८८ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केला असून, या कामांचे उद्घाटन श्रीक्षेत्र देवगडचे गुरुवर्य भास्करगिरी महाराज, रमेश महाराज वसेकर तसेच इंदूर राजघराण्याचे वंशज श्रीमंत मुकुंदसिंह राजे होळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार प्रशांत बंब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रामभाऊ लांडे, दिघे महाराज, विठ्ठल महाराज शास्त्री, बन्सीलाल बंब, राजेंद्र पिपाडा, किशोर धनायत यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंजूर निधीतून तालुक्यातील बाबळगाव, दहेगाव, कायगाव, शेंदूरवादा, तुर्काबाद, लखमापूर, जामगाव, मांडवा, गणेशवाडी तसेच खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील ऐतिहासिक बाखांचे संवर्धन व जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या अंतर्गत बारवांची संरचनात्मक दुरुस्ती, स्वच्छता, दगडी बांधकामाचे जतन, संरक्षण भिंती उभारणे तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
ऐतिहासिक वारसा जपणे ही
काळाची गरज : आमदार प्रशांत बंब
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या ऐतिहासिक बारव या केवळ जलस्रोत नसून त्या समृद्ध इतिहासाची, संस्कृतीची व लोककल्याणकारी दृष्टिकोनाची ओळख आहेत. अशा वारशाचे जतन व संवर्धन करणे ही सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून तालुक्यातील ११ ऐतिहासिक बारवांच्या संवर्धनासाठी २ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जलसंवर्धनाला चालना मिळून ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करता येईल. भावी पिढ्यांसाठी ऐतिहासिक ठेवा सुरक्षित राहील, असा विश्वासही आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केला.
अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा
बळकट होईल : भास्करगिरी महाराज
अहिल्यादेवी होळकर यांनी समाजहितासाठी जलसंवर्धन, धार्मिक व सांस्कृतिक वारशाचे जे कार्य केले, ते आजही प्रेरणादायी आहे. त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त ऐतिहासिक बारवांच्या संवर्धनाचा उपक्रम हाती घेण्यात आला, ही समाधानाची बाब आहे. या बारव म्हणजे संस्कृतीची, परंपरेची साक्ष देणाऱ्या वास्तू आहेत. आमदार बंब यांनी या कार्यासाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा कौतुकास्पद असून हा उपक्रम समाजासाठी दीर्घकाळ उपयुक्त ठरेल, असेही गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी आपल्या भाषणात सांगितले.
हा उपक्रम आदर्श ठरेल श्रीमंत मुकुंदसिंह राजे होळकर इंदूर राजघराण्याचे वंशज श्रीमंत मुकुंदसिंह राजे होळकर यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर यांनी समाजासाठी उभारलेला धार्मिक, सामाजिक व जलसंवर्धनाचा वारसा आजही महत्त्वाचा आहे. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त ऐतिहासिक बारवांच्या संवर्धनाचा उपक्रम सुरू होणे, ही अभिमानाची बाब आहे. या बारवा म्हणजे अहिल्यादेवींच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे. त्यांच्या जतनामुळे पुढील पिढीला इतिहास, संस्कृतीची ओळख मिळेल. शासन, लोकप्रतिनिधी व समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुरू झालेला हा उपक्रम आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार बंब तसेच संबंधित यंत्रणांचे आभार मानले.














